Wednesday, November 14, 2007

फसवणूक! (एक अतिसूक्ष्म परीकथा / एंडगेम)

मोठ्या उत्सुकतेने तिने त्याला आपल्या ओंजळीत उचलले.

'किती दिवस रे तुझी वाट पहायची? पण अखेर तू आलासच!' म्हणून त्याच्या ओठांचे चुंबन घेतले.

पण त्याच्यात काही बदल झाला नाही. तो शापित वगैरे नव्हताच मुळी!

'आज पुन्हा घात झाला! अशी किती रे दिवस फसगत होणार माझी? ही जातच मोठी फसवी. दुष्ट मेले! यांच्यावर कध्धीकध्धी विश्वास ठेवू नये! हाय दैवा, आजसुद्धा माउथवॉशने तोंड धुवावे लागणार!' ती हळहळली.

त्याच्यावर ढिम्म परिणाम झाला नाही. आपल्या निर्विकार, बटबटीत डोळ्यांनी तिच्याकडे बघत, 'डराँव' असे म्हणून, टुण्णकन उडी मारून तो समोरच्या दलदलीत पसार झाला.

Thursday, September 14, 2006

तात्पर्यकथा: दोन बेडूक

(फारा वर्षांपूर्वी 'रीडर्स डायजेस्ट' किंवा तत्सम मासिकात - अर्थातच लोकांनी काहीतरी बोध घ्यावा म्हणून छापलेली - एक बोधकथा वाचली होती. अचानक आठवली, द्यावीशी वाटली म्हणून देत आहे. कथा सुंदरच आहे, पण कथांमधून तात्पर्ये काढणे, बोध घेणे वगैरे प्रकारांत मी तसा पहिल्यापासून जरासा कच्चाच असल्यामुळे - आणि लेखकाने यातून घ्यायचा बोध स्पष्टपणे दिला नसल्यामुळे - यातून काय बोध घ्यावा हे नीटसे कळले नाही. म्हणजे, प्रयत्न केला, पण मी घेतलेले बोध लेखकाला अपेक्षित असतीलच, याची खात्री नाही. तेव्हा वाचकांस विनंती, की कृपया आपापल्या परीने योग्य ते बोध घ्यावेत.)

कथा:
दोन बेडूक
एकदा एका डेअरीफार्ममध्ये भटकणारे दोन बेडूक उड्या मारत मारत चुकून नुकत्याच काढून ठेवलेल्या दुधाच्या बादलीत पडले. बादली अर्धवटच भरली होती, त्यामुळे उड्या मारण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी बादलीच्या काठापर्यंत उडी मारण्याइतकी पोच दोघांच्याही उडीत नव्हती, आणि त्यामुळे बादलीबाहेर पडता येण्याची सुतराम् शक्यता नव्हती. म्हणून मग केवळ लगेच बुडून मरू नये म्हणून तरंगण्यासाठी पाय हलवत बसणे, याव्यतिरिक्त दोघांकडे दुसरा पर्याय नव्हता.
दूध चांगले घट्ट होते, त्यामुळे पाय हलवता हलवता त्या दोघांना दम लागला, तर त्यात नवल ते कसले? अशा परिस्थितीत दोघांपैकी एका बेडकाने विचार केला: "कितीही झाले तरी बादलीचा काठ उंचावर आहे, काही केल्या मी उडी मारून काठापर्यंत पोचू तर शकत नाही. या दुधात पाय मारण्याने मला दम लागण्यापलीकडे दुसरे काहीही होणार नाही. असाच पाय मारत मारत मी दमून जाऊन शेवटी बुडून मरणार. मग पाय मारून आताचे मरण थोडा वेळ पुढे ढकलणे यापलीकडे मी नेमका काय साधू पाहतोय? जाऊ दे!" असे म्हणून त्याने पाय मारण्याचे सोडून दिले, आणि ताबडतोब बुडून मरून गेला.
दुसरा बेडूक म्हणाला: "या क्षणी माझ्याकडे पाय हलवणे सोडल्यास दुसरा पर्याय नाही. त्यामुळे मी तात्पुरता का होईना, जिवंत राहू शकतोय. सध्या तरी प्रयत्न करत राहणे एवढेच माझ्या हातात आहे. कोण जाणे, यातून कदाचित पुढेमागे काहीतरी मार्ग निघेलही, आणि नाही जरी निघाला, तरी मरण्यापूर्वी प्रयत्न केल्याचे समधान माझ्याकडे असेल. तेव्हा मी प्रयत्न सोडणार नाही. मी पाय हलवत राहणार!"
असे म्हणून दुसरा बेडूक पाय हलवतच राहिला. थकला, तरी थांबला नाही. परिणामी त्याच्या पायांनी दूध घुसळले जाऊन दुधावर मलईचा थर जमा होत गेला. जसजसा तो पाय मारत राहिला, तसतसा मलईचा थर वाढत गेला, आणि शेवटी इतका वाढला, की बेडूक त्यावर आरूढ होऊन बादलीच्या काठापाशी पोचला, आणि उडी मारून बाहेर पडला.

बोध:

यातून मी घेतलेले काही बोध असे:
  • प्रयत्न केल्यास दूध 'चढणे' (केवळ दुधावर 'हाय' होणे) शक्य आहे. (With effort, it is possible to get high on milk alone.)
  • पुढच्या वेळी पिण्यासाठी तो (दुधाचा) पेला उचलण्यापूर्वी थांबा, विचार करा! तुमच्यापर्यंत येण्यापूर्वी त्या दुधात एखादा बेडूक मरून पडलेला असण्याची शक्यता काय आहे? याचा पूर्ण विचार करा, आणि मगच तो पेला तोंडाला लावा!
  • पर्यायाने, पुढच्या वेळी मलई खाण्यापूर्वी ती मलई बेडकाच्या पायांनी घुसळलेली असण्याच्या शक्यतेवर विचार करा. मलईची गोडी वाढेल.
  • मेदविरहित (फॅट-फ्री) दूध हृदयासाठी चांगले असण्याबाबत वैद्यकशास्त्र काहीही म्हणो; जिवावर बेतले, की कधीकधी 'होल मिल्क'च कामी येते.
मला तरी एवढेच सुचले! हे बोध अपेक्षित नसल्यास (किंवा आणखी काही शक्यता माझ्या नजरेतून सुटल्या असल्यास) हवी तशी दुरुस्ती करून घ्यावी / भर घालून घ्यावी.

- टग्या.

Wednesday, July 05, 2006

कोरे पान...

लेखकाच्या सद्य मन:स्थितीचे निदर्शक प्रतीक म्हणून हे पान सध्या कोरे आहे. जसजसा कचरा भरत जाईल, तसतसा तो येथे रिकामा केला जाईलच. काळजी नसावी.

"An idle mind is the devil's workshop."
(But, at present, the devil is idle...)