(फारा वर्षांपूर्वी 'रीडर्स डायजेस्ट' किंवा तत्सम मासिकात - अर्थातच लोकांनी काहीतरी बोध घ्यावा म्हणून छापलेली - एक बोधकथा वाचली होती. अचानक आठवली, द्यावीशी वाटली म्हणून देत आहे. कथा सुंदरच आहे, पण कथांमधून तात्पर्ये काढणे, बोध घेणे वगैरे प्रकारांत मी तसा पहिल्यापासून जरासा कच्चाच असल्यामुळे - आणि लेखकाने यातून घ्यायचा बोध स्पष्टपणे दिला नसल्यामुळे - यातून काय बोध घ्यावा हे नीटसे कळले नाही. म्हणजे, प्रयत्न केला, पण मी घेतलेले बोध लेखकाला अपेक्षित असतीलच, याची खात्री नाही. तेव्हा वाचकांस विनंती, की कृपया आपापल्या परीने योग्य ते बोध घ्यावेत.)
कथा:
दोन बेडूक
एकदा एका डेअरीफार्ममध्ये भटकणारे दोन बेडूक उड्या मारत मारत चुकून नुकत्याच काढून ठेवलेल्या दुधाच्या बादलीत पडले. बादली अर्धवटच भरली होती, त्यामुळे उड्या मारण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी बादलीच्या काठापर्यंत उडी मारण्याइतकी पोच दोघांच्याही उडीत नव्हती, आणि त्यामुळे बादलीबाहेर पडता येण्याची सुतराम् शक्यता नव्हती. म्हणून मग केवळ लगेच बुडून मरू नये म्हणून तरंगण्यासाठी पाय हलवत बसणे, याव्यतिरिक्त दोघांकडे दुसरा पर्याय नव्हता.
दूध चांगले घट्ट होते, त्यामुळे पाय हलवता हलवता त्या दोघांना दम लागला, तर त्यात नवल ते कसले? अशा परिस्थितीत दोघांपैकी एका बेडकाने विचार केला: "कितीही झाले तरी बादलीचा काठ उंचावर आहे, काही केल्या मी उडी मारून काठापर्यंत पोचू तर शकत नाही. या दुधात पाय मारण्याने मला दम लागण्यापलीकडे दुसरे काहीही होणार नाही. असाच पाय मारत मारत मी दमून जाऊन शेवटी बुडून मरणार. मग पाय मारून आताचे मरण थोडा वेळ पुढे ढकलणे यापलीकडे मी नेमका काय साधू पाहतोय? जाऊ दे!" असे म्हणून त्याने पाय मारण्याचे सोडून दिले, आणि ताबडतोब बुडून मरून गेला.
दुसरा बेडूक म्हणाला: "या क्षणी माझ्याकडे पाय हलवणे सोडल्यास दुसरा पर्याय नाही. त्यामुळे मी तात्पुरता का होईना, जिवंत राहू शकतोय. सध्या तरी प्रयत्न करत राहणे एवढेच माझ्या हातात आहे. कोण जाणे, यातून कदाचित पुढेमागे काहीतरी मार्ग निघेलही, आणि नाही जरी निघाला, तरी मरण्यापूर्वी प्रयत्न केल्याचे समधान माझ्याकडे असेल. तेव्हा मी प्रयत्न सोडणार नाही. मी पाय हलवत राहणार!"असे म्हणून दुसरा बेडूक पाय हलवतच राहिला. थकला, तरी थांबला नाही. परिणामी त्याच्या पायांनी दूध घुसळले जाऊन दुधावर मलईचा थर जमा होत गेला. जसजसा तो पाय मारत राहिला, तसतसा मलईचा थर वाढत गेला, आणि शेवटी इतका वाढला, की बेडूक त्यावर आरूढ होऊन बादलीच्या काठापाशी पोचला, आणि उडी मारून बाहेर पडला.
बोध:
यातून मी घेतलेले काही बोध असे:
- प्रयत्न केल्यास दूध 'चढणे' (केवळ दुधावर 'हाय' होणे) शक्य आहे. (With effort, it is possible to get high on milk alone.)
- पुढच्या वेळी पिण्यासाठी तो (दुधाचा) पेला उचलण्यापूर्वी थांबा, विचार करा! तुमच्यापर्यंत येण्यापूर्वी त्या दुधात एखादा बेडूक मरून पडलेला असण्याची शक्यता काय आहे? याचा पूर्ण विचार करा, आणि मगच तो पेला तोंडाला लावा!
- पर्यायाने, पुढच्या वेळी मलई खाण्यापूर्वी ती मलई बेडकाच्या पायांनी घुसळलेली असण्याच्या शक्यतेवर विचार करा. मलईची गोडी वाढेल.
- मेदविरहित (फॅट-फ्री) दूध हृदयासाठी चांगले असण्याबाबत वैद्यकशास्त्र काहीही म्हणो; जिवावर बेतले, की कधीकधी 'होल मिल्क'च कामी येते.
- टग्या.


2 comments:
टग्या दादा -
अनुदिनीबद्दल शुभेच्छा...
आधीच इतरत्र दिलेला प्रतिसाद येथे पुन्हा चिकटवितो आहे...
आपली तात्पर्य काढण्याची कमतरता खरोखरच दांडगी आहे! आम्हाला हेवा असूया, आणि आदरही वाटतो!!
असो ...
सप्तबोध -
(१) कूपमंडूक संस्कृतीचा वारसा चालवावा - डेअरीफार्ममध्ये भटकायला जाऊ नये.
(२) बादली अर्धी रिकामी आहे हे समजून घ्यावे - पेला अर्धा भरलेला वगैरे सकारात्मक दृष्टीकोन बिनकामाच्या "माणसा"ला ठीक!!
(३) खानदानी डेअरीफार्ममध्ये भटकल्यास बादलीत दूध कमी आणि पाणीच जास्त असेल या पुराणग्रंथातील ज्ञानाचा लाभ घ्यावा.
(४) बेडकाला दुधात पोहता येते! एका बेडकाने दुसऱ्या बेडकाचा खून करून अपघाताचा देखावा निर्माण केलेला आहे!!
(५) दुधात बोध शोधू नये.
(६) दुग्धादपि बोधामृतम् |
(७) मरावे परि किर्तीरूपे उरावे |
* अवांतर आणि समांतर बोध -
'रीडर्स डायजेस्ट' मधील हा लेख ही पंचतंत्रांची, इतकेच नव्हे तर गीतेची आणि उपनिषदांचीही निव्वळ उचलेगिरीच आहे. बोधप्राप्तीसाठी आणि नीतीमत्तेसाठीही सगळ्या जगाला शेवटी भारतीय संस्कृतीचेच पाय धरावे लागणार आहेत याचाच हा ढळढळीत दाखला आहे.
अचानक तुमचा ब्लॉग (पुन्हा) सापडला. तात्पर्ये (पुन्हा) वाचून मजा आली. तुमच्या मूळ लेखाला दिलेला प्रतिसाद इथे चिकटवत आहे.
तात्पर्ये (?) -
* (हात)पाय हालवले की मलई मिळते.
* प्रयत्न केल्यास अर्धी बादली दुधातून अर्धी बादली मलई निघू शकते.
कथेचा उर्वरित भाग तुम्ही वाचला नाही असे दिसते.
"... बाहेर उडी मारताच बेडकाचा गाडीच्या चाकाखाली करुण अंत झाला..."
तात्पर्ये -
* गाडीखाली येऊन मरण्यापेक्षा दुधात बुडून मरणे चांगले.
* आपल्याला हवे ते मिळाले तरी फार उड्या मारू नयेत.
नवीन पोस्ट्स वाचण्यास उत्सुक आहे.
कलोअ,
शशांक
Post a Comment